संग्रामपूर तालुका पत्रकार संघ अमरावती विभागातून अव्वल – ‘आदर्श संघ’ म्हणून निवड!
नितीन फुलझाडे
बुलडाणा:- मराठी पत्रकारितेतील उत्कृष्टता, संघटित कार्याचा वेध, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारहितासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने राज्यात ऐतिहासिक ठसा उमटवला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये, अमरावती विभागातून एकमेव निवड बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची झाली आहे.
ही निवड संघटनेच्या तडफदार कार्यशैलीची, चिकाटीची, तसेच प्रामाणिक सामाजिक योगदानाची ठळक दखल असल्याचे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घोषणेने संग्रामपूर तालुक्याचा मान राज्यभरात उंचावला आहे.
अमरावती महसूल विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची निवड झाल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषद मुंबई मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी केली.सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असा मानाचा बहुमान देऊन हा पुरस्कार कर्जत (जि. रायगड) येथे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यस्तरीय भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यातील हजारो पत्रकारांच्या साक्षीने हा कार्यक्रम दणदणीत पार पडणार आहे.
पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य व वसंतराव काणे यांच्या नावे देण्यात येणारा हा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेच्या पत्रकार संघ पुरस्कारांपैकी एक असून, संग्रामपूर संघाला हा बहुमान मिळणे हे अत्यंत अभिमानाचे मानले जात आहे.
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सरांसह राज्य पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतभाई राजपूत व सर्व पदाधिकारी-मंडळींचा सक्रिय सहभाग व मार्गदर्शन आणि संघातील तरुण कार्यकर्त्यांचे नवचैतन्य—या सर्वांचा परिपाक म्हणजे हा राज्यस्तरीय गौरव असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रामपूर तालुका पत्रकार संघ सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका, लोकसहभागातून जनजागृती, तसेच नागरिकांच्या अडचणी शासनदरबारी पोहोचवण्याचे कार्य उल्लेखनीयपणे करत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी लेखन नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार संघाकडे राज्यभरात पाहिले जाते. निवडीमागचे खरे कारण म्हणजे विविध सामाजिक उपक्रम, तळागाळातील पत्रकारांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, जनहितासाठी चालवलेली सततची मोहीम, तसेच लोकसहभागातून घेतलेले उपक्रम यामुळे परिषदेने संग्रामपूरची दखल घेतली. त्यानंतर परिषदेच्यावतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.या गौरवाबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतभाई राजपूत यांनी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आदिवासी बहुल तालुक्यातील पत्रकार संघाला संग्रामपूर – बुलढाण्याचा मान उंचावणारा अभिमान मिळाल्याबद्दल तसेच
राज्य पातळीवरील या भव्य गौरवाबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, सत्यशोधक समिती जिल्हा कार्याध्यक्ष अझहर आली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, केंद्रीय जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, सहसचिव शेख रफिक पन्ना, कोषाध्यक्ष वासुदेव दामोधर, तालुका संघटक श्याम इंगळे, संघटक मोहन सोनोने, विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, आकाश पालीवाल,हल्लाकृती समिती स्वप्निल देशमुख, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्मळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, सचिव निलेश तायडे यांनी सर्व सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Tags
खबरबात स्पेशल
