Khabarbat News- सोशल मीडियाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची घाई एक सामाजिक समस्या

 




चिखली (नितीन फुलझाडे)

*एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर लगेच कोण लवकरात लवकर त्या दुःखद घटनेची निधन वार्ता टाकेल यासाठी जणूकाही एक प्रकारची त्या व्यक्तीच्या जवळील मित्र,नातेवाईक यांच्यात स्पर्धा सुरू होते.अक्षरशा एखाण्या व्यक्तीच्या निधनाची दुःखद वार्ता त्या व्यक्तीच्या घरापर्यंतही पोहचली का नाही याचीही शहानिशा न करता एक प्रकारे आपली स्वतःची त्या व्यक्तीबाबत किती काळजी,कळवळा आणि आपुलकी होती व आपल्याला किती जास्त दुःख झाले हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे मंडळी म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला अनपेक्षित पणे अनेक अडचणी व संकटे निर्माण करतात.एखाद्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा एखादा व्यक्ती भरपूर दिवसापासून आजारी होता व त्याचा मृत्यू झाला तर ताबडतोब भावपूर्ण श्रद्धांजली ही पोस्ट टाकली ही गोष्ट समजू शकते,पण जर एखादा व्यक्ती चालता बोलता आपल्यातून कायमस्वरूपी चालल्या गेला म्हणजे त्याचा मृत्यू झाला तर त्या गोष्टीवर विश्वास बसण्यासाठी आपल्याला स्वतःलाही भरपूर वेळ लागतो तसेच अशा व्यक्ती बाबत आपण "भावपूर्ण श्रद्धांजली" लिहितो आणि सोशल मीडियावर ती दुःखद घटना अतिघाई करत शेअर करतो हे कितपत योग्य* 

       *काही वेळा तर मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवारातील सगळ्या व्यक्तीपर्यंत  ती दुःखद वार्ता माहीत देखील नसते,तरीदेखील ह्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे एखाद्या वेळेस त्यांचे नातेवाईक परिवारातले व्यक्ती कुठे बाहेर शिक्षणासाठी किंवा काही कामांसाठी असले तर त्यांना ही बातमी सोशल मीडिया वरून माहीत होते हे फार गंभीरच.कारण अशावेळी जर त्यांना ही बातमी व्हाट्सअप फेसबुक व इतर सोशल मीडिया माध्यमातून माहित पडली तर त्यांना जबर धक्का बसू शकतो व त्या व्यक्तींना सावरण्यासाठी त्यांच्यासोबत परिवारातलं त्यावेळी कोणीही नसते,त्यामुळे त्यांच्याही जीवितास हानी पोहोचू शकते इतका गंभीर हा विषय आहे. त्यामुळे आपण कितीही कुणाच्या जवळचे असलो आणि त्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाल्यास काही संकेत पाळणे आवश्यक आहेत. अशा घटनांमध्ये आताताईपणा न करता सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर निधन वार्ता वाऱ्यासारखी पसरविणाऱ्या या मंडळींनी थोडा संयम दाखवणे ही काळाची गरज आहे.जेणेकरून आपण चांगल्या भावनेने आप्तेष्ठांना माहिती व्हावी या निर्मळ हेतून जरी हे मेसेज पसरवीत असलो तरी यामुळे कोणाचं तरी मन दुखेल किंवा अचानक त्या परिवारातील सदस्याला एक जबर धक्का (शॉक) बसेल असे होऊ नये यासाठी कृपया अति घाई करणे योग्य नाही.कोणीही हा विषय वैयक्तिक घेऊ नये ही विनंती. तूर्तास...*.



Previous Post Next Post