फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी




*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना निवेदन*

नितीन फुलझाडे 

बुलडाणा: फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

               या संदर्भात डॉ. मुंडे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक श्री. अनिल महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांच्याकडे वारंवार तक्रार केली असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे हे कायदा सुव्यवस्थेच्या आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याशिवाय, आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाईक-निंबालकर तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचेही समोर आले आहे. अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हा संविधान आणि कायद्याच्या शासनाच्या तत्त्वांना विरोधी आहे.

                  डॉ. मुंडे यांनी आपल्या सेवाकालात वैद्यकीय प्रामाणिकतेने काम करताना काही प्रकरणांमध्ये पोलीस दबाव नाकारला होता, त्यामुळेच त्यांच्या छळाची तीव्रता वाढली. त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी केल्या होत्या व माहिती अधिकाराखाली अर्जही दाखल केला होता. मात्र योग्य वेळी कारवाई न झाल्याने अखेरीस त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. या प्रकरणात पोलिसांकडून निष्क्रियता, शवविच्छेदनात झालेला विलंब आणि प्राथमिक तपासातील त्रुटी या बाबी चौकशीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तसेच, मृत व्यक्तीचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न काही समाजमाध्यमांतून सुरू आहे, ही बाबही अत्यंत निंदनीय आहे.

            या सर्व घटनांवरून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासकीय सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया खडसान, उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षा पिंपळे, रत्ना शेळके, अनिता गायकवाड, सुनिता गाकवाड, स्मिता वराडे, शितल सुरडकर, सपना इंगळे, वंदना मेढे, श्रध्दा आराख, कविता भागीले, संगीता सोनुने, सुवर्णा जाधव, बेबी परिहार, सुनिता सुरडकर, शारदा दाभाडे, सरला चौथनकर, सविता राऊत, आरती जाधव, सुनिता दराखे, सोनाली वाघ, मिना इंगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थि‍त होत्या.  

Previous Post Next Post