चिखली शहरात एस. व्ही. एम. अभ्यासिकेचे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन...
चिखली:- शहरातील एस. व्ही. एम. या अभ्यासिकेचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते पार पडले.उद्घाटन प्रसंगी बोलताना श्वेता ताईंनी सांगितले की,
"चिखली शहर आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघात शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनासाठी ठोस काम आपण सर्वांनाच करायचे आहे. ही अभ्यासिका म्हणजे त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगलं अभ्यासाचं वातावरण मिळावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पुढील काळात मतदारसंघातील इतर गावांमध्येही अशा अभ्यासिका आणि फिटनेस क्लब सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” त्यासाठी धाड येथील अभ्यासिकेकरिता सुमारे एक कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला असल्याचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की,
"चिखली शहराचा विकास फक्त रस्ते, नाली किंवा इमारतींमध्ये नाही तर शिक्षण आणि युवकांच्या प्रगतीत दिसला पाहिजे. आपल्या भागातील तरुणांनी घराजवळ राहून अभ्यास करावा, तयारी करावी आणि अधिकारी बनून या शहराचं नाव मोठं करावं, हीच खरी अपेक्षा आहे. एस. व्ही. एम. अभ्यासिका हे त्यासाठीचं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे.” याप्रसंगी त्यांनी व मंचकावर उपस्थित असलेले नगरपरिषद मुख्याधिकारी आणि चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनीही आपल्या स्पर्धा परीक्षेच्या संघर्षाच्या काळात आलेले विविध अनुभव विद्यार्थी व श्रोते यांना कथन केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते. प्रमुख उपस्थित म्हणून चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, चिखली पोलीस स्टेशनचे थानेदार संग्राम पाटील,श्री अंकुशराव पडघान,भाजपा नेते पंडित दादा देशमुख,नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड,चिखली मंडळाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित,भाजपा जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष संतोष काळे, ऍड. मंगेश व्यवहारे,श्री गोपाल तुपकर, शुभम तुपकर,अनिसभाई व इतर मंडळी हजर होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वायाळ यांनी तर सूत्रसंचालन अनंत आवटी यांनी केले. सुरेंद्र ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एस.व्ही.एम. परिवारातील अनिस शेख, मंगेश पळसकर, माधव मोरंपल्ले, प्रफुल्ल देशमुख, शेख मुजमील, गणेश तुपकर, युसुफ शेख, गणेश गावंडे, राजेश खरात, गौरव तुपकर, आकाश जैवाळ आदींनी पुढाकार घेतला. उद्घाटन सोहळ्याला शहरातील नागरिक आणि माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
