नितीन फुलझाडे
बुलडाणा दि.०२ : दिल्ली येथे पार पडलेल्या "खेलो इंडिया" १७ वर्षांखालील राष्ट्रीय महिला तिरंदाजी स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय प्रांजल प्रविण नरवडे हिने सब ज्युनियर रिकर्व्ह गटात तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ पदकाची मानकरी ठरली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी प्रांजलच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबीयांसोबत तिचा सत्कार केला.
या प्रसंगी ॲड. जयश्री शेळके म्हणाल्या, “प्रांजलने खेळातील आपली निष्ठा, अपार मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे. सततचा सराव, कठोर परिश्रम, आणि शिस्तीच्या जोरावर तिने बुलडाणा जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. तिच्या यशामागे तिच्या कुटुंबियांचे नैतिक पाठबळ, त्यांचा त्याग आणि मानसिक आधार हे मोठे कारण आहे. घरातील सर्वांनीच तिला प्रोत्साहन दिले, म्हणूनच प्रांजल आज या शिखरावर पोहोचली आहे. अशा उभरत्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
तिने खेळासाठी शाळेचा वेळ, सुट्ट्या, अनेक खाजगी क्षण बाजूला ठेवत अखंड परिश्रम घेतले, हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, प्रांजलचे वडील डॉ.प्रविण नरवडे, आई डॉ.विजया नरवडे तसेच इतर कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते. प्रांजलच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
