“मागचा पीक विमा मिळाला नाही... आणि आता हुमणी अळीचे पंचनामे?” - पवन पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

 


नितीन फुलझाडे 

चिखली:- तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अजूनही मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून हुमणी अळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असे पंचनामे करणे म्हणजे केवळ फार्स ठरत आहेत काँग्रेस नेते पवन  पाटील यांनी यावर तीव्र शब्दांत सरकारवर हल्ला चढवला आहे.

"मागील हंगामात नापिकी झाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून जाहीर केलेल्या पीक विम्याचे पैसे आजतागायत मिळालेले नाहीत. अनेक शेतकरी शासन दरबारी फेऱ्या मारून थकलेत. आणि आता पुन्हा हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला की पंचनाम्याच्या नावाखाली नवीन नाटक सुरू आहे!" सरकारला शेतकऱ्यांची खुप काळजी असे दाखवण्याची आणि दिशाभूल करण्याची लबाडी सरकार करीत आहे- असा घणाघात पवन  पाटील यांनी केला.


त्यांनी सरकारवर टीका करताना पुढे सांगितले की, "हे सरकार केवळ घोषणा करण्यात माहीर आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच जमा होत नाही. मागचं नुकसान भरून न देता नवीन नुकसानाचं केवळ पंचनामे करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे."


शेतकरी वर्गात यामुळे तीव्र नाराजी असून, "जर लवकरच मागील पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांच्या सोबत काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Previous Post Next Post