नितीन फुलझाडे
चिखली: शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्रे तसेच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून यामुळे शहरातील नागरिक भयभीत व त्रस्त झालेले आहे. शहरातील या भटक्या व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. मंगलाताई झगडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की चिखली शहरामध्ये आज घडीला मोकाट कुत्रे तसेच मोकाट जनावरे भर रस्त्यावर रात्री व दिवसा ठाण मांडून बसतात त्यामुळे अनेक वेळा वाहनांचे अपघात सुद्धा होतात. रात्रीच्या वेळेला मोकाट कुत्री एकाच ठिकाणी जमा होऊन रात्रभर नुसते भुंकत व ओरडत असतात त्यामुळे रात्री अपरात्री नागरिकांची झोपमोड झाल्यामुळे त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे व दुसरे असे की ही मोकाट कुत्री लहान बालकांवर सुद्धा हल्ले करून त्यांना जखमी करीत आहेत.
या निवेदनाद्वारे सौ झगडे यांनी नगरपालिकेकडे कोंडवाडा सुद्धा उपलब्ध आहे तरी आपण मागील वर्षे प्रमाणे कुत्रे पकडण्याचे पथक त्वरित बोलावून मोकाट कुत्रे व इतर मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली यांना केली आहे.सदर निवेदनावर माजी नगरसेविका सौ. मंगलाताई झगडे,सुभाषआप्पा झगडे, सचिन कोकाटे, संजय असोलकर, राजूभाऊ राजपूत, योगेश झगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
