पुरवठा अधिकारी टेकाळे २५ हजारांची लाच घेताना पकडले

 






नितीन फुलझाडे 

बुलढाणा : हमीभावाने ज्वारी विकलेल्या शेतकऱ्याचे थकीत देयक लवकर मिळावे, यासाठी २५ हजारांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२३ जुलै) दुपारी पुरवठा अधिकारी कार्यालयात करण्यात आली.


ही घटना उघडकीस आल्यानंतर महसूल खात्यात एकच खळबळ उडाली असून, आरोपी टेकाळे याच्यासह त्याचा हस्तक व कार्यालयातील निवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे यालाही अटक करण्यात आली आहे.

🌀🔴 शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ व ९५५२५२०१८८ तसेच टोल फ्रि क्रमांक १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी केले आहे.🔴

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव योजनेंतर्गत ज्वारी विकली होती. मात्र विक्रीचे पैसे मिळण्यात विलंब होत होता. या देयकासाठी लवकर मंजुरी देण्यासाठी टेकाळे याने खंडागळे यांच्या मार्फत शेतकऱ्याकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर रक्कम ५० हजार ठरवली गेली आणि ती दोन टप्प्यांत देण्याचे ठरले.


या प्रकरणी शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर खातरजमा करून पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना टेकाळे याला अटक करण्यात आली. त्याचवेळी खंडागळे यालाही ताब्यात घेण्यात आले.

         या दोघांविरोधात त्यांचेविरुद्ध लाच मागणी व स्विकारल्याबाबत पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधिक्षक अमरावती, अॅन्टी करप्शन ब्युरो सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधिक्षक अमरावती, अॅन्टी करप्शन ब्युरो,यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, सापळा पथक पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुंसीगे, सफौ. शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेद्र क्षीरसागर, पोना / जगदीश पवार, पोकॉ. रंजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, गजानन गाल्डे, मपोकॉ स्वाती वाणी चानापोकॉ/ नितीन शेटे अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली.




 





Previous Post Next Post