मातृशक्तीचा सन्मान आणि युवापिढी वाचवन्यासाठी आ.सौ. श्वेता महाले यांची विधिमंडळात मागणी:
दारूचे ग्रामीण भागातले थैमान आवरा...आ. सौ. श्वेताताई महाले
चिखली:- आपल्या मातृशक्तीचा, माता-भगिनींचा सन्मान व युवा पिढीला व्यसनापासून वाचवायचे असेल तर महाराष्ट्र दारुबंदी सुधारणा विधेयक 2025 मधील तरतुदी अधिक कडक कराव्यात अशी कळकळीची मागणी आ. सौ. श्वेता महाले यांनी आज विधिमंडळात केली
श्री. सुधीर मुनगंटीवार व श्री.अतुल भातखळकर यांनी आणलेल्या विधेयकावर बोलताना ग्रामीण भागात अनेक संसारांची दारूने कशी दुर्दशा केली आहे याचे विदारक चित्र आ. सौ. श्वेता महाले यांनी आज सभागृहापुढे मांडले.
आपल्या भाषणात बोलतांना आ. सौ श्वेता महाले यांनी दारुमुळे ग्रामीण भागात किती दुर्दशा होत आहे यावर प्रकाश टाकला. "अनेक महिला मजुरी व शेतावर राबून चार पैसे कमवून आणतात आणि त्यांचे व्यसनी पती मारझोड करून ते पैसे हिसकावून घेतात. गुत्त्यावर जाऊन दारू पितात. हा प्रकार पाहून त्या घरातील बालमनावर विपरीत परिणाम होतो. त्यांनाही लहानपणीच व्यसन लागते. पण खिशात पैसे नसल्यामुळे ही मुले वाईट मार्गाला लागतात. समाजावर याचा खूपच वाईट परिणाम होत आहे." यामध्ये ग्रामीण समाजातील महिला व बालमनावर याची विपरीत परिणाम होत असल्यामुळे याबाबतीत काही कठोर पावले उचलता येतील अशी अपेक्षा असल्याचे आमदार सौ. श्वेता महाले म्हणाल्या.
ग्रामीण भागात दारूबंदी करण्यास गावाचा सहभाग आवश्यक असतो परंतु त्यामध्ये येणाऱ्या अडचणी विषयी आमदार सौ श्वेता महाले यांनी उलगडा केला. गावांमध्ये आम्ही फिरतो तेव्हा माताभगिनी आमच्याकडे तक्रार करतात की, एखादा रस्ता, नाली कमी झाली तरी चालेल, पण गावात दारूबंदी करा. आम्ही त्यांना ग्रामपंचायतचा ठराव घ्यायला सांगतो तेव्हा तो ठराव पारित होण्याच्या अटीही अतिशय जाचक आहेत. त्यामुळे दारूबंदी होत नाही. या अटी शिथील कराव्यात अशीही मागणी या वेळी आ. सौ. श्वेता महाले यांनी केली.
एवढी दूरदर्शन होत असतानाही जबाबदार असलेल्या पोलीस यंत्रणेचे यावर पुरेसे लक्ष नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. यात पोलीस प्रशासनही आपली जबाबदारी निभावत आहे. जेव्हा लोकप्रतिनिधीकडे तक्रार येते तेव्हा तो ठाणेदाराला फोन करतो. मात्र बीट जमादारच अवैध दारू पाडणार्यांना टिप देत असल्यामुळे तालुक्यातून पोलीस पथक गावात जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट केले जातात. पोलीसांना हात हलवत परत यावे लागते. मग ज्या महिलांनी लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली त्यांचे पतीच त्यांना घरी आल्यावर मारहाण करतात.हे अतिशय दुर्दैवी आहे असे आ. सौ. श्वेता महाले म्हणाल्या.
आपल्या मातृशक्तीला सन्मानाने जगता यावे यासाठी हा दारूबंदीचा कायदा अधिक कडक करून युवापिढीलाही व्यसनापासून वाचवावे अशी आग्रहाची विनंती आ. सौ. श्वेता महाले यांनी सभागृहाला केली.
Tags
चिखली विधानसभा
