योजनाची प्रभावी अंमलबजावणी करा: आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश
बुलडाणा : आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती व अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषद कार्यालय येथे बैठकीदरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्याचप्रमाणे, ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम, आरोग्य संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा, तसेच बालिकांच्या जन्मदरावर विशेष भर देत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाशी संलग्न कामांबाबत चर्चा करण्यात आली. दि. 11 जुलै ते 18 जुलै 2025 या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह प्रभावीपणे राबविण्याबाबतही सर्व संबंधितांना आवश्यक ती कार्ययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, कुटुंब कल्याण कार्यक्रम अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा साथरोग तथा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतून विविध आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
