चिखली : समाजकार्यात सातत्याने अग्रेसर राहणारे आणि भारतीय जनता पक्षाशी (भाजपा) गेल्या दोन दशकांपासून निष्ठेने जोडले गेलेले शेख करामत शेख रहमतउल्ला यांचे सुपुत्र शेख तौफिक यांची भाजपा चिखली शहर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती चिखली शहराध्यक्ष सागर दुर्गाप्रसाद पुरोहित यांनी विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या आदेशानुसार केली आहे.
शेख तौफिक यांना सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा त्यांचे वडील शेख करामत यांच्याकडून लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय असून, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भाजपाने त्यांना चिखली शहर चिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला अनुसरून सर्वसमावेशक विकासकामे केली आहेत. सर्व धर्म समभावाची भूमिका घेत त्यांनी चिखलीत अभूतपूर्व विकास कार्य केले आहे. विशेषत: मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. शेख तौफिक यांची चिटणीसपदी नियुक्ती हा त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शेख तौफिक यांची नियुक्ती ही भाजपाच्या सर्वसमावेशक धोरणाचे द्योतक आहे. पक्षाने नेहमीच सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन काम करण्यावर भर दिला आहे. चिखली शहरातही या नियुक्तीमुळे पक्षाची लोकांशी असलेली बांधिलकी आणि सर्व धर्म समभावाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ही नियुक्ती चिखलीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेख तौफिक यांच्या नेतृत्वाखाली चिखलीत भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि सामाजिक कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या नियुक्तीनंतर आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी शेख तौफिक यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “शेख तौफिक हे त्यांना सोपवलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देतील आणि पक्षाच्या कार्याला अधिक बळकटी देतील.”
शेख तौफिक यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मला दिलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडेन, समाजसेवेच्या माध्यमातून चिखलीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”
शेख तौफिक यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. शेख तौफिक यांनीही सर्वांचे आभार मानले असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
