शेतकरी व नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसीलदार काकडे यांचे आवाहन
(नितीन फुलझाडे)
चिखली:- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याबाबत सूचना आल्याने चिखली कार्यालय येथे चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी शेतकरी व नागरिकांना जलदगतीने सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने 28 एप्रिल रोजी तहसील परिसरात नागरी सुविधा केंद्राचे(सेतू) लोकार्पण भाजपा ज्येष्ठ नेते अंकुशराव पडघान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार सुधीर चेक पाटील, पत्रकार नितीन फुलझाडे,भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, नायब नाझर नीरज काकडे, भाजपा सरचिटणीस युवराज भुसारी,केंद्र चालक विजय महाजन यांचेसह तहसीलचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
या नागरी सुविधा केंद्रामार्फत प्रतिज्ञापत्र,जात प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,नॉन क्रिमीलेअर,शेतकरी दाखले, राशन कार्डची कामे इत्यादी सर्व प्रकारच्या शासकीय दाखले व सर्व प्रकारची तहसील मध्ये उपलब्ध नागरी सुविधा पुरविल्या जाणार आहे.यावेळी अंकुशराव पडघान पाटील यांनी केंद्र चालक महाजन यांना नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत सूचना दिल्या व नागरिकांची कामे शासकीय धोरणानुसार जलद गतीने करावी असेही सांगितले. तरी या नागरी सुविधा केंद्राचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार संतोष काकडे यांनी केले आहे.