सैलानी बाबा संदल उस्ताहत साजरा....

 



उंटणीवर फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाचा गजर

लाखो भाविकांच्या साक्षीने सैलानी बाबांचा संदल                                      


   चिखली :-                   पिंपळगाव सराई येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी शहा मिया उर्फ सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अथनि होळीपासून सुरुवात झाली. दरम्यान, १९ मार्च रोजी पिंपळगाव सराई गावातून रात्री आठ वाजताच्या सुमारात संदलला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरा लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात संदल चढला. महाराष्ट्रातील सैलानी भक्त यांनी यावेळी हजेरी लावली.

अजिंठा डोंगर कुशीत वसलेल्या पिंपळगाव सराई येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्यात आहे. सैलानी बाबाचे मनोभावेदर्शन घेण्यासाठी होळी व संदलमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने यात्रेच्या ठिकाणी दाखल झाले होते. पिंपळगाव सराई गावातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान शेख रफिक मुजावर, शफिक मुजावर, शेख चांद मुजावर, शेख जहीर मुजावर, शेख नईम मुजावर, शेख रशीद मुजावर यांच्या संदल घरामध्ये पोथी पुराणाचे वाचन करून संदलाला धूप अगरबत्ती चंदनाचा लेप देऊन मलिदा नैवेद्य दाखवून चंदनाची पूजा करून उंटणीवरून सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला.



सैलानी बाबा संदल उंटनीची चिखलीचे भक्त हरिभाऊ राऊत यांनी सजावट केली. संदल उंटणीवर भाविकांनी गुलाबाच्या फुलांचा वर्षावकरून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरामध्ये सैलानी बाबा संदलची पिंपळगाव सराई गावातून मिरवणूक काढण्यात आली. पिंपळगाव सराई ते सैलानी डोंगराच्या पायथ्याने पांदीच्या रस्त्याने सैलानी बाबाची संदल मिरवणूक रात्री १० वाजेच्या दरम्यान सैलानी बाबाच्या दर्यावर पोहचली. रात्री ११ वाजेच्या दरम्यान सैलानी दर्यावर संदल चढवला. संदल चढल्यानंतर भाविकांनी दर्शन घेऊन परतीचा रस्ता धरला. त्यामुळे रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावर्षी सैलानी बाबाचा संदल मिरवणून लाखो भाविकांच्या उपस्थित काढण्यात आली. रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त लावला होता. यामध्ये अमरावती, नागपूर, यवतमाळ वाशीम, अकोला, बुलडाणा येथील अतिरिक्त पोलिस अधिकारी कर्मचारी, दंगा काबू पथक, कमांडो पथक यांचा बंदोबस्त लावला होता.



 सैलानी बाबाचा संदल निघणार असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक सैलानीत दाखल झाले होते. संदल दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ड्रोन कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रसंग निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत यात्रेतील रस्ते मोठे केले होते. तसेच रुग्ण वाहिका, अग्निशमन दलाच्या  गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्या सोबतच आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली होती.


Previous Post Next Post