विद्यार्थ्यांना अनौपचारिक वातावरणात शिकण्याची उत्तम संधी देतात - प्राचार्य डवले
धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयाची एकदिवसिय शैक्षणिक सहल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशस्वीरित्या पार पडली.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा या सहलीमध्ये समावेश होता.
अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जाणे आवश्यक आहे.अशा शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांना अनौपचारिक वातावरणात शिकण्याची उत्तम संधी देतात,तसेच इतर विद्यार्थी आणि शिक्षकांशी दीर्घकाळ टिकणारे नाते निर्माण करतात.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गेली होती.वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर,जनार्दन स्वामी समाधी स्थळ, खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर,दौलताबादचा किल्ला इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहली दरम्यान भेटी दिल्या.ऐतिहासिक स्थळांची माहिती सहल प्रमुख अमोल जाधव,प्रविण चव्हाण,प्रफुल्ल हिवाळे,आकाश डोंगरे यांनी सांगितली.सहलीच्या उत्तम नियोजनासाठी शाळेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.वेरूळ लेणी येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी विदेशी पर्यटकांशी संवाद साधला व त्यांच्यासोबत फोटोही काढले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहली द्वारे ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मनोज दांडगे, सचिव उमेश दांडगे, विश्वस्त संतोष दांडगे तसेच पालक व नागरिक यांनी विद्यालयाचे कौतुक केले.