चिखलीकरांनी घेतला सुटकेचा श्वास..
चिखली:- गेल्या २४ तासापासून चिखली शहरात धुमाकूळ घालणाऱ्या व तब्बल ६६ चिखलीकरांना चावा घेणाऱ्या “त्या” पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यामध्ये न प आरोग्य विभागाला आज सकाळी ११ वाजे दरम्यान यश मिळाले.
सविस्तर असे की काल दिनांक १२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपासून ते आज पावेतो सकाळी ११ वाजेपर्यंत त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर सुरूच होता यामध्ये ६६ नागरिकांना त्यांने चावा घेतला. स्थानिक ग्रामीण रुग्णालय चिखली येथे त्या रुग्णांनी उपचार घेतले. यातील आठ रुग्णांना बुलढाणा जिल्हा रुग्णालय येथे देखील रेफर करण्यात आले. या सर्व घटनाक्रमावर ग्रामीण रुग्णालय चिखली व न.पा. आरोग्य विभाग करडी नजर ठेवून होते. यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख दिलीप इंगळे यांना एक टीम तयार करून काल रात्री अकरा वाजेपर्यंत त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी मोहीम स्वतः हजर राहून हाती घेतली होती. काल रात्रीपर्यंत 48 रुग्ण संख्या झाली होती. यामध्ये गौरक्षण वाडी येथील नागरिकाला त्या कुत्र्याने रात्री शेवटचा चावा घेतल्याचे समजते. आज सकाळपासून परत चिखलीकर दहशत मध्ये होते. दरम्यान कृष्णा नगर (संभाजीनगर) भागात त्या कुत्र्याने काही नागरिकांना आज सकाळी चावा घेतला, त्यावेळी दैनिक वृत्तधर्म वृत्तपत्राचे प्रतिनिधी मोहन मेहेत्रे यांनी ते बघताच न.पा. आरोग्य विभागाला फोन द्वारे माहिती दिली. नगर पालिका चिखलीची टीम ताबडतोब त्या भागात आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे, खरे, बावणे व इतर कर्मचाऱ्यासह हजर झाली. त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. अखेर स्वामी समर्थ मंदिराजवळ त्याला बंदिस्त केले गेले. त्यामुळे चिखलीकरांनी पहिल्यांदाच २४ तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पिसाळलेल्या कुत्र्याने ६६ नागरिकांना चावा घेतल्याची घटना अनुभवली.ग्रामीण रुग्णालय चिखली व नगर पालिका चिखली यांनी जनजागृती केल्याबद्दल पत्रकार मंडळीचे देखील आभार मानले.शेवटी आता चिखलीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
Tags
ALERT...