पशुपालकांनी अचुक माहिती द्यावी -मुख्य कार्यकारी अधिकारी

बुलडाणा, (जिमाका) दि. 22: 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या 25 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट अशा 16 प्रजातीच्या जाती, लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते.सदर पशुगणना दि.25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून पशुगणनेसाठी नागरी भागाकरीता प्रती 4 हजार कुटुंबामागे 1 प्रगणक व 10 प्रगणका मागे 1 पर्यवेक्षक तर ग्रामीण भागाकरिता प्रती 3 हजार कुटुंबामागे 1 प्रगणक व प्रति 5 प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे.प्रगणकाव्दारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची खरी माहिती प्प्रगणकांनी दयावी असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
Previous Post Next Post