अकोला- अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व कन्नुभाई मश्रुवाला चरखा प्रशिक्षण व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जवाहर बाग, अकोला येथे तृतीय तरुणाई चरखा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत भारतरत्न, भारतीय राजनितीचे युगपुरुष लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त चरख्यावर सूत कताई करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव कानकिरड,सचिव डाॅ.मिलिंद निवाणे,ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, संयोजक अक्षय राऊत, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शुभम राठोड,रामकृष्ण खादी मिशन चे महेश आढे,सर्वोदय शेतकरी मंच चे श्रीकृष्ण विखे पाटील, महिला संघटिका सविता शेळके, युवती संघटिका गौरी सरोदे,प्रांजली देशमुख, विद्यार्थी संघटक अथर्व सुधीर पाटील, प्रथमेश इंगळे, समृद्धी सरोदे ,डाॅ.आकाश इंगळे यांचेसह युवकांनी चरख्यावर सूत कताई केली.
"जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. सत्ता परिवर्तन नाही तर समाज परिवर्तन हेच त्यांचे ध्येय होते. आजच्या तरुणांनी चरख्याच्या माध्यमातून स्वावलंबन आणि स्वाभिमान शिकावा, हाच खरा जेपींना अभिवादन असेल."असा मनोदय मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत १५ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींनी हात चरखा, पेटी चरख्याचे प्रशिक्षण घेतले. गांधी विचार आणि सर्वोदय विचाराची ओळख यावेळी करून देण्यात आली.
सर्वोदय परिवाराचे कार्यकर्ते , प्रशिक्षणार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.'अंधेरेमे एक प्रकाश-जय प्रकाश..जय प्रकाश ','हमारा मंत्र-जय जगत ','हमारा तंत्र-ग्राम स्वराज 'या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.
