भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी – सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज
जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तर बुलडाणा जिल्ह्यातील विविध शाखानी अनेक जलस्रोतांची स्वच्छता केली व चिखली शाखेच्या वतीने वायझडी तलावाची स्वच्छता केली...
नितीन फुलझाडे
चिखली :-२३ फेब्रुवारी २०२६: प्रोजेक्ट अमृत अंतर्गत‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी रविवारी २२ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या करण्यात आले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा शाखेच्या वतीने येळगाव तलाव व शेगाव,लोणार मेहकर, नांदुरा, मलकापूर, खामगाव,ह्या सर्व शाखाच्या वतीने अनेक जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. संत निरंकारी मंडळ शाखा चिखली च्या वतीने सुद्धा वायझाडी तलाव येथे स्वछता करण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक तथा ज्ञानप्रचारक शालिकराम चवरे गुरुजी,चिखली नगरपरिषदेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, नगरसेवक दिपक वाधवानी, नगरसेवक सुरेंद्र ठाकूर, पुरुषोत्तम वायाळ,अमोल लहाने, श्रीराम झोरे, गोकुळ शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी चवरे गुरुजी यांनी संत निरंकारी मंडळाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली त्यानंतर सभापती जोगदंडे यांनी सांगितले कि मंडळाच्या सेवा कार्याबद्दल मी अतिशय भारावून गेलो व तुमच्या या सेवा कार्याला माझ्या कडून जी मदत लागेल ती मी माझ्या विभागाकडून देत राहील.
संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ‘प्रोजेक्ट अमृत’ हा उपक्रम राबविण्यात आला. मानवाला निसर्गाबद्दल अधिक संवेदनशील बनवत जलसंरक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलनाचा सामूहिक संकल्प दृढ करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
यावेळी दिल्ली येथे आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की, बाबाजींची शिकवण ही केवळ स्मरण करायची नसून ती जीवनात अंगीकारण्यासाठी आहे. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू, तर प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते.सेवा, सुमिरण आणि सत्संग हेच जीवनाचे अधिष्ठान असल्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच सुसंगत आहे. भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
या सत्संगामध्ये निःस्वार्थ सेवेतूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असा संदेश देण्यात आला. बाबाजींच्या शिकवणी प्रत्येक हृदयात तेवत राहोत आणि हेल्थ सिटीसारखे प्रकल्प मानवकल्याणाचे नवे आदर्श प्रस्थापित करो, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिवांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. देशभर प्रसारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आयोजनाची सुसूत्र आणि संस्कारित कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली. याच वेळी खुल्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निःसंशय, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.
