Khabarbat News- चिखली तालुका पत्रकार संघाचे जीवन गौरव, शोध पत्रकारिता आणि नव पत्रकारिता पुरस्कार जाहीर; ६ जानेवारीला होणार वितरण

 





नितीन फुलझाडे 

चिखली : चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या तीन पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कपूर यांना जीवन गौरव, देऊळगाव मही येथील सुनील मतकर यांना शोध पत्रकारिता तर सैय्यद साहिल सैय्यद राजू यांना नवपत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले. येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील शिदोरीगृह येथे दर्पण दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

             चिखली शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक 'चिखली अंजली'चे मुख्य संपादक रमाकांत गयाप्रसाद कपूर यांना यंदाचा प्रतिष्ठित 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तीन दशकांहून अधिक काळ निष्पक्ष, निर्भीड आणि समर्पित पत्रकारितेच्या योगदानाची दखल घेऊन संघाने सर्वसम्मतीने हा निर्णय घेतला. कपूर यांनी १९९० मध्ये 'दैनिक लोकदूत'पासून पत्रकारितेला सुरुवात केली, नंतर 'दैनिक नेतृत्व'मध्ये सेवा बजावली आणि १९९५ पासून 'चिखली अंजली'चे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. आज ते मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून जनहित, धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या मुद्द्यांवर त्यांची लेखणी नेहमीच प्रभावी ठरली आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील  अनुभवी पत्रकार सुनील सुदाम मतकर यांना संघाने शोध पत्रकारिता पुरस्कारासाठी निवडले आहे. पुण्यनगरीसह विविध माध्यमांत जवळपास २२ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने शोधपत्रकारिता केली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात घडामोडी घडवून आणणाऱ्या त्यांच्या मालिकांनी जिल्हाभरात लक्ष वेधले. सध्या ते व्हाईस ऑफ मीडिया बुलढाणाचे जिल्हा कार्याध्यक्ष असून शासनाकडून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. जीवनसाथी फाउंडेशनच्या माध्यमातूनही ते सामाजिक कार्य करत आहेत.

               प्रतिकूल परिस्थितीतून उदयास आलेल्या चिखली येथील युवा पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू (उर्फ सद्दाम) यांना संघाने "स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार २०२५" जाहीर करून नव्या पिढीला प्रोत्साहन दिले आहे. चिखली शहरातील सय्यद साहिल यांनी गरीबी आणि आव्हानांना तोंड देत शिक्षण पूर्ण केले आणि २०१८ पासून 'विदर्भ सिटीजन' दैनिकात तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. नंतर लोकप्रिय ई-पेपर 'हॅलो बुलढाणा' मध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. आज बुलढाणा जिल्ह्यात सर्वात वेगवान आणि अचूक बातम्या देणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर चिखली शहरात त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post