नितीन फुलझाडे
अकोला - विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती,निसर्ग प्रेम व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत करण्यासाठी वनराई युथ फाऊंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दी निमित्त अकोला येथे दिनांक 17 व 18 जानेवारी 2026 ला वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक बबनराव कानकिरड व गजानन जनार्दन चौधरी यांनी दिली आहे.
राजकीय कोलाहापासून अलिप्त राहून ज्यांनी आपल्या आयुष्याचे शब्द, श्वास आणि श्रम भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित केले असे डॉ. मोहन धारिया हे पर्यावरण चळवळीचे दीपस्तंभ मानले जातात.त्यांचे अजोड कार्य उदयोन्मुख पिढीने अभ्यासावे, त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरणार आहे.
वनराई चळवळीने वनीकरण, पर्यावरण, जल संवर्धनाच्या जन आंदोलनासाठी देश पातळीवर विविध उपक्रम राबवले त्याची ऊजळणी या संमेलनात होणार आहे. बालकुमारां चे भाव विश्व फुलवण्यासाठी वनराईचा संदेश देण्यात येईल. जल, जंगल,जमीन, जनावर, जीव,जंतू व जनता या घटकांसोबत माणूस केंद्रस्थानी ठेवून जैवविविधतेवर आधारित सात सूत्री पर्यावरणीय 'सेवन जे ' जाहीरनामा जलसंवर्धन क्षेत्रातील अग्रणी कार्यकत्याच्या माध्यमातुन जाहीर करण्यात येणार आहे. 'निसर्गाशी संघर्ष नव्हे तर सहजीवन हाच विकासाचा खरा मार्ग आहे ' हा विचार या संमेलनाचा आत्मा असेल.
पर्यावरण चळवळीच्या दृष्टीने हे संमेलन दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे.महाराष्ट्रातील वनीकरण, पर्यावरण,जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अभ्यासक यांना संमेलनासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात येत आहे.
