<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2408468329421715"
crossorigin="anonymous"></script>
नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो. 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांनी लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता. राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून सर्व लहान मुलांना वाटले. जिवंत बैलांप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट पुडे अशा विविध वस्तू तेथे बांधण्यात आल्या. बैलाजवळ मुलांना उभे करून बैलांची पूजा केली जायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटले जायचे. ही परंपरा सातत्याने सुरु होती. आजही नागपूरातील महाल परिसरात ती पहायला मिळते.
नागपूरसह विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तान्हापोळ्या निमित्त सगळ्याच वयोगटातील लोक लाकडी बैल घेऊन त्याची पुजा करून हा सन आनंदाने साजरा करतात. त्यातच नागपुरातील सनियर भोसला पॅलेसमधील तब्बल आठ फुट उंचीचा लाकडी बैल सर्वांचे लक्ष वेधून घेतो. नागपुरातील या सणाला व लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्याला तब्बल 235 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण म्हणून साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला शहरातील अनेक भागात लाकडी बैलांचा पोळा भरतो. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा होत नाही.
लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी ‘तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. तान्हा पोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. बैल पोळ्याच्या पाडव्याला नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा उत्साहात साजरा केल्या जातो. ही ऐतिहासिक परंपरा असलेल्या या पोळ्याची सुरूवात राजे रघुजी भोसले यांनी केली होती. तेव्हा पासुन तान्हा पोळा साजरा करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा शहराचा अनोखा सण विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे.
या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्या कारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. गेल्या काही वर्षांपासुन या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जाते. त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काहीनाकाही छोटी भेटवस्तु दिली जाते. त्यानंतर ही मुले घरी येतात.
ज्याप्रमाणे मोठ्या बैलांची सर्व प्रथम घरी पुजा केल्या जाते. त्याचप्रमाणे या लाकडी बैलांच्या पूजेला देखील घरुन सुरुवात होते. त्यानंतर ही मुले आपल्या शेजारी व नातेवाईकांकडे जाऊन ‘बोजारा’ जमा करतात, म्हणजे त्यांना पैसे किंवा भेटवस्तु दिल्या जाते. लहान मुलांना देखील शेतीचे व त्यात राबराब राबणाऱ्या बैलांचे महत्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती विषयी ते कृतज्ञ राहावे, यासाठी कदाचित तान्हा पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा विदर्भात रुजली असावी. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. सर्वाना तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
