चिखलीमध्ये देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचे थाटात उदघाटन संपन्न...

 


महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या हिताचा विचार हाच देवाभाऊंचा विचार.....ना. चंद्रशेखर बावनकुळे

नितीन फुलझाडे 
चिखली: - " महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस हे नेहमी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या हिताचा विचार करत असतात तोच वारसा चिखलीचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी घेतल्याचे दिसून येत असून चिखलीच्या आमदार सौ श्वेता महाले यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप जास्त विकास निधी खेचून आणला आहे आणि शासन स्तरावर कोणतीही नवी योजना आली की ती योजना चिखली मतदारसंघासाठी कशी खेचून आणता येईल यासाठी त्या मुख्यमंत्री कार्यालयात देखील अगदी पदर खोचून तयार असतात" अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांचे कौतुक केले.

चिखली मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या लाडक्या बहिण पतसंस्थेचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे चिखली येथे आले होते, त्याप्रसंगी बोलताना त्यांनी माजी मंत्री दिवंगत श्री पांडुरंग फुंडकर यांची देखील आठवण काढली. त्यांचे कर्तुत्व आणि कर्तव्य याचा योग्य वारसा आकाश फुंडकर आणि श्वेता महाले जपत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या भावना एका लाडक्या बहिणीने आपल्या भाषणातून नामदार बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त केल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या जनहिताच्या कामाची नियोजनच अशाप्रकारे आहे की आगामी पाच वर्षांमध्ये देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था ही महाराष्ट्रातील 14 कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे असे नामदार बावनकुळे म्हणाले.

 बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा व ताराबाई शिंदे यांच्यासारख्या दूरदर्शी महिलेचा वारसा लाभलेला आहे. हाच वारसा चिखलीच्या आमदार सौ श्वेता ताई पुढे नेत आहेत जून महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींचीच असलेली एक पतसंस्था असावी असा विचार त्यांनी मांडला व मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात चिखली मध्ये देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था स्थापन होत आहे याची संपूर्ण श्रेय आमदार श्वेता महाले यांना जाते असे नामदार बावनकुळे म्हणाले.
 
 चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी समाजातील शेवटच्या गरीब घटकांचाही विचार करणारे एक महिला त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात पाठवली आणि या महिलेच्या अभ्यासपूर्ण कामातून ही योजना सुरू झाली. त्यांनी खऱ्या अर्थाने या विधिमंडळामध्ये आणि या विधानसभेच्या विकासाकरता केंद्र सरकार,राज्य सरकारच्या सर्व योजना,माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारच्या योजना, देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरिता प्रचंड ताकद लावली. 

 देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना देऊच पण आमचं सरकार जोपर्यंत आहे या पाच वर्षांमध्ये आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे हे पंधराशे रुपये 2100 रुपये करण्याची योजना सुद्धा आमचं सरकार पुढच्या पाच वर्षाच्या काळात करणार आहे, आमच्या शेतकरी लाडक्या भावाकरिता देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे असे सांगून ना. बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी हा योग्य मार्ग नसून खरोखर ज्या शेतकऱ्याला ज्या गरीब शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी देणार असल्याबाबत नामदार बावनकुळे यांनी प्रतिपादन केले.

तुकडेबंदी कायदा,स्वामीत्व योजना अशा योजना लागू करून देवेंद्र फडणवीस सरकारने गरिबातील गरीब व्यक्तीचा देखील विचार केला असल्याचे व हाच विचाराचा वारसा चिखली विधानसभेच्या आमदार सौ श्वेता महाले यांनी मतदारसंघात चालवला असल्याचे व त्यासाठी देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था हे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन नामदार बावनकुळे यांनी केले.

खऱ्या बांधकाम मजुरांना देवेंद्र फडणवीस सरकारकडून विविध 27 योजनांचा फायदा मिळणार असून यासाठी स्थानिक आमदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार असल्याचे व बांधकाम मजूर यांना देखील लाडकी बहीण पतसंस्थेच्या माध्यमातूनच आर्थिक फायदा पोहोचवता येईल का? याविषयी शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे नामदार बावनकुळे म्हणाले.

 विविध शेतांच्या सीमा, पांधन रस्ते, शिव रस्ते यावरून होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी वृक्षरोपणाचा वापर करण्याची एक अभूतपूर्व योजना व त्यामधून प्रत्येक ठिकाणी किमान 12 फुटाचा रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा 10 कोटी झाडांचे वृक्षारोपण करणार असल्याचे नामदार बावनकुळे म्हणाले.

 चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचे विशेष कौतुक करताना नामदार बावनकुळे यांनी श्वेता महाले यांनी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रिमंडळाकडे व मंत्र्याकडे पाठवलेला कागद रिकामा कधीच परत येत नाही,महाराष्ट्रात सर्वात जास्त योजना श्वेताताई महाले यांनी खेचून आणल्या असून,पुढच्या 5 वर्षात अडीच कोटी लाडक्या बहिणी लाडकी बहीण पतसंस्थेसाठी श्वेताताईचे आभार मानतील.असे कौतुक केले.

 याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक आदर्श योजना म्हणून ज्या जिवंत सातबारा योजनेची कौतुक झाले आहे, ती जिवंत सातबारा योजना चिखली तालुक्याने महाराष्ट्राला दिलेले स्पेशल गिफ्ट आहे या शब्दात या मोहिमेचे कौतुक करत या जिवंत सातबारा योजनेची मूळ संहिता मांडणाऱ्या चिखली तहसीलदार श्री संतोष काकडे यांना प्रशस्तीपत्र देऊन, त्यांनी मांडलेली कल्पना विधानसभेत सादर करून संपूर्ण महाराष्ट्राला एक नाविन्यपूर्ण व उपयोगी योजना देणाऱ्या आमदार श्वेता महाले व तहसीलदार काकडे यांच्यामुळे महाराष्ट्रातील 20 लाख लोकांना फायदा झाल्याचे नामदार बावनकुळे म्हणाले.

 या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे, सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोताराम कायंदे, सुरेश अप्पा कबुतरे, विजय कोठारी, सतीश गुप्त,माजी आमदार शशिकांत खेडेकर त्याचप्रमाणे डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, अमोल साठे, संतोष काळे, पंजाबराव धनवे, संजय गाडेकर, एकनाथ जाधव, बंडू अंभोरे, सागर पुरोहित,सुरेंद्र पांडे व असंख्य पदाधिकारी हजर होते.
Previous Post Next Post