परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील




शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

नितीन फुलझाडे 
बुलढाणा: 11 जुलै 
शाळेच्या दैनंदिन परिपाठापासून तर दिवसाअखेरच्या गृहपाठाच्या तासिकेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्यविकासाची संधी उपलब्ध करून देणे हीच आता आधुनिक शैक्षणिक गुणवत्तेची परिभाषा नावरूपास येत असून त्यासाठी सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेने शिक्षकांना प्ररेीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने आज (दि. 11 जुलै) शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक गुणवत्ता कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेप्रसंगी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, योजना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. समाधान डुकरे, डॉ. मारोती गायकवाड, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. किरण पाटील म्हणाले की, लहान वयात अनेक कौशल्य सहजपणे शिकण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असते. तथापि ती संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज माहितीतंत्रज्ञानाच्या युगात जगातील अनेक भाषा शिकण्याची संधी सुध्दा विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकते. एवढेच नव्हे तर आर्टीफिशिअल इंटिलिजन्स चा वापर दैनंदिन अध्यापनात करणे सुध्दा शक्य आहे. मात्र त्यासाठी आजचा शिक्षक हा स्वत: चौकस व जिज्ञासू असायला हवा. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांशी संवाद साधण्याची इच्छा आहे. मात्र ते शक्य होत नसल्याची खंत देखिल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केली. तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन प्रभावी संनियंत्रणासाठी शाळा भेटी देऊन तळागाळातील प्रत्येक शिक्षकाला नव्या आव्हानांबाबत जाणीव करून द्यावी. सोबतच त्यांना विद्यार्थ्यंच्या कौशल्याधारीत शैक्षणिक विकासासाठी प्रेरीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्या जिल्हा परिषद शाळेत त्यांची पाल्य दाखल केलेली आहेत. अशावेळी त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण , मुलभूत भौतिक सुविधा व त्यांच्या क्षमता विकसित करणारे शिक्षण देणे ही आपल्या सर्व यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या पर्यवेक्षकीय भेटींची संख्या वाढवून याबाबींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.



नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक सत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी घेषित केलेल्या पटसंख्या वाढवा-पारितोषिक मिळवा या आवाहनाला सुध्दा लक्षणीय यश मिळत असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत असल्याचे गुलाब खरात यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढावा यासाठी पुढील काळात आणखी नियोजनपूर्वक लक्ष केंद्रीत केल्या जाईल, असे सुध्दा गुलाब खरात यांनी सांगितले.



यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी शालेय शिक्षणातील नव्या संकल्पना ,  आव्हाने व संधी या विषयावर सर्व उपस्थित क्षेत्राीय अधिकाऱ्यांना सर्वंकष मार्गदर्शन केले. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळा गुणवत्तेच्या प्रवाहात समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी शासनाच्या सर्व योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ होईल व निर्धारीत उद्यिष्ट साध्य होईल याकडे सुध्दा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे प्रास्तविक प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले. दिप प्रज्वलनाने कार्यशाळेचा आरंभ झाला. सूत्र संचलन शिक्षण विस्तार अधिकारी वृंदा कुळकर्णी यांनी केले.
Previous Post Next Post