जाचक अटी रद्द करा; योजनांचा लाभ पोहचू द्या :- ॲड.जयश्री शेळके




*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या अटींमुळे गरजू लाभार्थी वंचित*

नितीन फुलझाडे 

बुलडाणा, दि.२४ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांवरील जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी समाजकल्याण विभागाकडे केली आहे. समाजाच्या वंचित घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनांचा उद्देशच शासनाच्या कठोर अटींमुळे अयशस्वी ठरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


           अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील तरुण, बेरोजगार, महिला व उद्योजक यांना स्वावलंबनासाठी शासकीय कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात जामीनदारांची सक्ती, तीन हमीदारांचे हमीपत्र, सातबाऱ्यावर बोजा नोंद, 700 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअरची अपेक्षा, बँकेकडून प्राथमिक मंजुरी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेतील अडचणी यांसारख्या अटी लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासदायक ठरत आहेत.



*“शासनाने 1000 कोटींचे भांडवली अनुदान दिले असले, तरी अशा अटींमुळे लाभार्थी योजनांपासून दूर राहतात. ग्रामीण भागातील गरजू, होतकरू तरुण व महिलांना या अटी पार पाडणे शक्य नसते,” असेही शेळके यांनी सांगितले.*


            त्यामुळे, महामंडळाच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी आणि लाभार्थ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी शासनाने या अटी तात्काळ रद्द करून एक सुलभ आणि व्यवहार्य प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी समाजकल्याण विभागाकडे केली आहे. यावेळी मेहकर विधानसभा मतदार संघांचे आमदार मा. सिद्धार्थभाऊ खरात, जिल्हाप्रमुख वसंतभाऊ भोजने, उपजिल्हाप्रमुख आशिषदादा रहाटे, सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, युवासेना शहर प्रमुख अनिकेतभाऊ गवळी उपस्थित होते !

Previous Post Next Post