दीपक खरात यांचा कॉंग्रेसला रामराम...

 



प्रभागाच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासासाठी भाजपा पक्षप्रवेश- दीपक खरात


आ.श्वेताताई  महाले व जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश

नितीन फुलझाडे 
चिखली:- आगामी नगर पालिका  निवडणुका पाहता चिखली कॉंग्रेसला मोठा धक्का दीपक खरात यांनी राम राम केल्याने बसणार आहे.दीपक खरात युवकांचे ताईत म्हणून पक्षासाठी काम करत होते.




आज २६ जून रोजी चिखली मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ.श्वेताताई  महाले पाटील यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दीपक खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात सायंकाळी ६ वाजता संत सावता माळी भवन येथे जाहीर प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.




"सर्वांगीण विकासासाठी आणि आपुलकीच्या जाणीवेने मा आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल…"
माझ्या प्रभागातील प्रिय बंधू-भगिनींनो,
आज मी तुमच्यासमोर उभा आहे एक नवा निर्णय घेऊन – पण तो निर्णय केवळ माझा नाही, तर आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून, मी प्रभागासाठी रात्रंदिवस एक करून काम करत आलो. तुमच्या प्रत्येक अडचणींना स्वतःचं दुःख मानलं आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी प्रत्येक लढाई लढत राहिलो.
कोरोना काळात तर स्वतःच्या कुटुंबाची चिंता न करता, रस्त्यावर उतरलो – कारण आपल्या माणसांचं रक्षण हेच माझं कर्तव्य होतं.
आज मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे — हा निर्णय कुठल्याही राजकीय फायदेशीर गणितासाठी नाही, तर प्रभागाच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासासाठी आहे.
पण एक महत्त्वाचं सत्य मी आज प्रांजळपणे मांडू इच्छितो 
या निर्णयामागे केवळ विकासाची इच्छा नाही, तर आपल्या माणसांमध्ये निर्माण झालेला दुरावा मिटवण्याची एक खोल जाणीवही आहे.
आज आपल्या घरात, आपल्या प्रभागात — मतभेद वाढलेत, मनभेद झालेत.
आपल्या लोकांमध्येच संवाद हरवू लागलाय,
ही दरी भरून काढणं हेही माझं जबाबदारीचं काम आहे.
म्हणूनच मी ठामपणे सांगतो "हा निर्णय पक्षबदलाचा नाही, तर आपल्या लोकांमधली आपुलकी पुन्हा जोडण्याचा आहे."
मतभेद संपावेत, मनं एकत्र यावीत, आणि आपला प्रभाग एकसंधपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावा — हाच खरा हेतू डोळ्यांसमोर ठेवून मी हे पाऊल उचललं आहे.
आज मी पक्ष बदलत आहे,पण माझं तुमच्याशी असलेलं नातं, माझी निष्ठा, माझं प्रेम – तेवढंच शुद्ध आणि प्रामाणिक आहे.
हा दीपक खरात, नेहमीसारखाच तुमच्यासोबत होता, आहे आणि असेल.
आपल्या नव्या प्रवासात तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असावे हीच इच्छा आहे …
                                   आपलाच
                                 दिपक खरात

Previous Post Next Post